Thursday, 14 July 2016

जिद्दीचा प्रवास - Monsoon Bike Ride

"Four wheelers move body, Two wheelers move soul!" अस म्हटलं जात, अन अगदी त्याचाच प्रत्यय आला तो "जिद्दी" सोबत केलेल्या "Monsoon Bike Trek" मधे. ११ बाईक्स, २२ लोक, ३५० किलोमीटर्स आणि भन्नाट पाऊस…


काही लोकांसाठी "पाऊस-चहा आणि भजी" हे Combination Perfect असतं, पण काहीं साठी पाऊस-मोटारसायकल आणि ऍडव्हेंचर हेच "Perfect Combination" असत!! अशाच काही "जिद्दी" वृत्तीचा लोकांनी ऐन पावसाळ्यात एक बाईक-ट्रेक चा प्लॅन आखला...
पटापटा सदस्य नोंदणी झाली, तयारी सुरू झाली, WhatsApp, Facebook वरूनच बरेचसे व्यवस्थापन झाले, बाईक्स मेंटेनन्सला दिल्या, सगळ्या ग्रुप मधे एक उत्साहाच वातावरण होतं. बाईक ट्रेकच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी एक मिटिंग घेण्यात आली. ज्यामध्ये सर्व महत्वाच्या सूचना दिल्या गेल्या. ट्राफिक आणि इतर सर्व नियम समजावण्यात आले.  दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक ५:३० वाजता निघायचं ठरलं.
 रात्री सर्व तयारी झाल्याची पुन्हा एकदा खात्री केली. हेलमेट, ग्लोव्हझ् , बाईक ची डॉक्युमेंट्स, जर्किन, शूज, गॉगल, फस्ट-एड बॉक्स, लिस्ट खूप मोठी होती.


आणि शेवटी तो दिवस उजाडला... २६ जून २०१६
रात्रभर मनसोक्त पडल्यामुळे पाऊस तसा शांतच होता... ठरल्या प्रमाणे ५:३० ला आम्ही निघालो.
रत्नागिरी - पावस मार्गे राजापूर वरून गगनबावडा असा रूट ठरला होता. पहाटेची वेळ, रिमझिम पाऊस, वारा, थंड आल्हादायक वातावरण आणि बाईक्स ची धडधड...  उत्साहात पण शिस्तीने सर्वजण जात होते. सेफ्टी आणि रस्त्यावरील इतर वाहनांना गैरसोय होऊ नये म्हणून ५ आणि ६ जणांच्या २ टीम केल्या होत्या. प्रत्येक टीम मध्ये २-२ वॉकी-टॉकी होत्या. पूर्णपणे सज्ज असलेल्या मोटारसायकल्स चा पथका ला बघून लोकं ही क्षणभर आश्चर्याने बघत होती. एक वेगळीच एक्ससाईटमेन्ट होती.

रस्ता तसा मोकळाच होता. ६:३० ला कशेळी आणि ७:३० ला राजापूर ला पोहोचलो. प्रवासातल्या पहिल्या ब्रेक आणि नाश्त्या साठी इथे थांबलो. गरमा गरम चहा आणि मिसळीचा आस्वाद घेऊन पुढे निघालो. आता रस्ता थोडा कठीण होता! घाट-वळणे , निसरडे रस्ते, पावसाळ्याचे दिवस असल्याने कोसळलेल्या दरडी आणि जोराचा पाऊस याचा सामना करत मोटारसाइकल्स चा ताफा निघाला होता. हा एक फार वेगळा अनुभव होता.



सुमारे १०-१०:१५ ला गगनबावडा घाटावर विराजमान झालेल्या - गगनगिरी महाराजांच्या मठावर पोहोचलो.
वरती एक अद्भुत आणि प्रसन्न वातावरण होतं. सोसाट्याचा वारा, दूर नजर जाईल तेवढी हिरवळ आणि धुक्याच्या खाली लपलेले घाटातले रस्ते... व्वा! मनःशांती म्हणतात ती याला... मंदिर परिसर फिरून आणि मनसोक्त "Selfie" काढून झाल्यावर ११:३० ला तिथून निघालो ते "कळे" या गावाच्या दिशेने.





दुपारी १ चा सुमारास कळे ला पोहोचलो.  एव्हाना सगळ्यांच्या पोटात भुकेने कावळे ओरडू लागले होते. जिद्दी च्या आयोजकानी  इथल्या एका ढाब्या वर जेवणाची सोय आधीच करून ठेवली होती. गप्पा आणि मजा मस्ती करत जेवणाचा कार्यक्रम आटपला. थोडी विश्रांती घेतली आणि प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावर निघालो

आता बाईक ट्रेकचा शेवटचा सर्वात शेवटचा पण सर्वात महत्वाचा टप्पा राहिला होता.  तो म्हणजे - "अणुस्कुरा घाट." आता पावसाने चांगलाच जोर धरला होता. मुसळधार पावसातून हिरव्यागार  परिसरातून रस्ता कापत गाडया निघाल्या होत्या. आजूबाजूचा निसर्ग पाहून मन प्रसन्न होत होतं. पण सोबतच प्रवासाचा थकवा आता जाणवायला लागला होता. पाठ-पाय दुखायला सुरुवात झाली होती. वळणा-वळणाचे रस्ते संपता-संपत नव्हते पण "जिद्दी" मन ही थांबायला तयार नव्हते.

बघता बघता अंतर संपले, संध्याकाळ चे ४ वाजले आणि शेवटी पाहोचलोच...  
"अणुस्कुरा घाट" -  बाईक्स एका बाजूला पार्क केल्या आणि समोरचा निसर्ग पाहून मन क्षणभर स्तब्ध झाले. कोल्हापूर आणि  कोकणाला जोडणारा हा सुंदर घाट राजापूर जवळ आहे. निसर्गाने या परिसरावर  मुक्त उधळण केली आहे. धुक्यात हरवलेला रस्ता, एका बाजूला खोल दरी, हिरवीगार झाडं आणि त्यात थंडगार वारा.  मगासपासून आलेला प्रवासाचा थकवा एका क्षणात नाहीसा झाला. आणि मग सुरू झाला सकाळपासून थोडासा बाजूला पडलेला "Photo  Session". वेळ कधी गेला कळलंच नाही. फोटोग्राफी आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटल्यावर मग परती ची वेळ जवळ आली. खरंतर निघायची इच्छाच नव्हती, पण काय करणार. ५ वाजून गेले होते आणि अजून बरेच अंतर कापायचे होते. काळोख पडण्या पूर्वी राजापूर गाठायचे असा प्लॅन आधीच ठरलेला होता.


पुन्हा एकदा सगळा हिरवागार निसर्ग डोळ्यात साठवून आणि पर्वतातली स्वच्छ हवा हृदयात भरून आम्ही परतीचा प्रवासाला निघालो...

६:३० चा दरम्याने राजापूर गाव आले. वाटेत पावसाने चांगलेच झोडपले होते.. अगदी रेनकोट घातलेले ही चांगले भिजले होते... आता ऐकवेळ बाईक मध्ये पेट्रोल नसले तरी चालेल, पण पोटात चहा हवाच होता. गावातल्या एक छोट्याश्या हॉटेल मध्ये गरम गरम चहा आणि बिस्कीट खाल्ल्यावर थंडी थोडीशी कमी झाली. खूप सारी मजा मस्ती आणि एकमेकांची थट्टा करत "टी-टाईम" संपला. आणि आम्ही रत्नागिरीच्या दिशेने निघालो…

अर्ध्या तासाचा इकडे तिकडे फरक सोडता व्यवस्थितपणे ८:३० चा सुमाराला रत्नागिरीत पोहोचलो.

खरंतर प्रवास संपला होता...  पण मनात आयुष्याचा एका "नवीन प्रवासाची" ही सुरुवात होती...

उत्कृष्ठ आयोजन आणि मिळालेल्या या एका अविस्मरणीय अनुभवासाठी  ‘धीरज आणि जिद्दी च्या आयोजक टीम’ ला, खूप खूप धन्यवाद !!!


Saturday, 14 May 2016

Life is a Ride...

"Kick start the day,
Race your life,
Change the gear of thoughts, 
Ride out your dreams
And
Case the goals! 
Its Your Life... Its Your Race With You."
~ AnujDeo